सिटीपिडीया कशासाठी ?

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Jump to: navigation, search

शहरीकरण हे आजच्या जगाचे आणि भारताचीही एक वास्तव आहे. २३ मे २००७ या दिवशी जगातील शहरी लोकसंख्या जगातील ग्रामीण लोकसंख्येपेक्षा काकणभर का होईना जास्त झाली म्हणून तो दिवस जागतिक इतिहासात ऐतिहासिकच मानायला हवा. २०३० आणि २०५० साली हे चित्र उत्तरोत्तर आणखी गडद होत जाणार आहे.

शहरीकरणातून अनेक प्रश्न उभे राहिले आहेत ज्याला सर्वसाधारण जनतेला रोजच तोंड द्यावे लागते. ज्याप्रमाणे विकिपीडिया हा ज्ञानकोश जगातील जनतेने सामुदायिकपणे विकसित केला त्याचप्रमाणे शहरीकरणाचा वेध घेण्यासाठी सीटीपीडिया हा सामुदायिकपणे तयार होणार असून त्याचा उपयोग सर्वसाधारण नागरिकांना शहरीकरणातून उद्भवणाऱ्या दैनंदिन प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी व्हावा अशी कल्पना आहे.

प्रगत, पश्चिमी देशांतील शहरीकरण हा वेगळा विषय आहे आणि आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या मागासलेल्या देशांतील शहरीकरण हा वेगळा विषय आहे. आपण सीटीपीडियातून भारतासारख्या देशांतील शहरीकरणाचा वेध घेणार आहोत. ठाणे, मुंबई महानगर क्षेत्रातील शहरीकरणाकडे बघितले तर जाणवते की कायदेकानू, नोकरशाही कारभाराच्या मुलायम आवरणाखाली सर्वसाधारण जनतेला विविध पद्धतींनी बेदखल करून त्यावर हात मारण्याची प्रक्रिया विविध पद्धतींनी विविध पातळ्यांवर अव्याहत चालू असते. मग जमीन असो, धोकादायक इमारती असोत, महापालिका तिजोरीतील खर्च असोत, शहरातील वृक्ष वनराई असो.

शहरी जनता, सर्वसाधारण नागरिक हा रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात या सर्व अनागोंदी कारभाराबद्दल अनभिद्न्य राहातो आणि असहाय्य, एकाकी पडतो. त्यासाठी आवश्यक आहे सोप्या भाषेत शहरीकरणाचे सर्व पैलू समजून घेणे आणि आपल्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे. सीटीपीडिया यासाठी एक विश्वासू मित्र, मार्गदर्शक ठरू शकेल.

सीटीपीडियात निवारा, नियोजन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, स्थानिक स्वराज्य, जनसंस्कृती हे प्रमुख विभाग असतील आणि त्यात आणखी उपविभाग होत जातील. त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगर क्षेत्र, महाराष्ट्रातील नागरी बातम्या दररोज एकत्रितपणे उपलब्ध केल्या जातील. नागरिकांच्या, संस्थांच्या, व्यक्तींच्या यशोगाथा मांडण्यात येतील. तसेच आपल्यापुढे असलेली आव्हाने, संकटे यांचेही विवेचन असेल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूरसारख्या विभागातील ग्रामीण जनतेची परवड आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे होणारी शेतकऱयांची दैनाही मांडली जाईल.

सीटीपीडिया सध्या तरी मराठी भाषेत आहे. तो वाचायला, शहरीकरणाच्या संदर्भातला एखादा विषय समजून घेण्यासाठी सर्वांना उपलब्ध असेल. इतकेच नव्हे तर तद्न्यांच्या बरोबरीने सर्वसाधारण व्यक्ती त्यात आपले लेखन करू शकतील, मते व्यक्त करू शकतील, आपली सुखदुःखे मोकळेपणे मांडू शकतील. सीटीपीडियातील लिखाण सोपे, पटकन वाचण्यासारखे असेल आणि त्याचवेळी दर्जेदार असेल असा प्रयत्न राहील. लौकरच सीटीपीडिया मोबाईल ऍपवर उपलब्ध केला जाईल.