माहिती अधिकाराची उत्तरे टीएमसी वेबसाईटवर अजून का नाहीत?

From CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues
Revision as of 00:36, 31 July 2018 by अनिल शाळीग्राम (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Mahiti.jpg
ठाणे ३१ जुलै २०१८:(महाराष्ट्र् टाईम्स वृत्त) माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थेट पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातील, अशी घोषणा ठाणे महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, आजतागायत पालिकेच्या वेबसाइटवर एकही उत्तर प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे पालिकेने पारदर्शी कारभाराबाबतची केलेली घोषणा हवेतच विरली असून या घोषणेच्या अंमलबजावणीचा मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील माहिती अधिकाराचा मुद्दा भलताच वादग्रस्त ठरला होता. वादग्रस्त पद्धतीने माहिती मिळवून त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनाही मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना वादग्रस्त पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे उत्तर राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने अशा वादग्रस्त कार्यकर्त्यांची माहिती ठाणे पोलिसांकडे सोपविली असून खंडणीविरोधी पथकामार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. त्याच कालावधीत पालिकेतील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थेट वेबसाइटवर दिली जातील, अशी घोषणा पालिकेतर्फे करण्यात आली होती. मात्र, एप्रिल महिन्यापासून अशी कोणतीही माहिती पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या घोषणेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.